अवैध दारुची तस्तकरी करणाऱ्यास चढला बंदुकीचा जोर

49

दारू तस्कराने मारहाण करून पिस्तूलने धमकावले

 

गडचिरोली, ता. ९ : दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत दारू तस्करीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. व्यवहारातील पैशावरून एका दारूतस्कराने रानात नेऊन मारहाण केली व डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याची तक्रार या धंद्यात एजंट म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने ८ एप्रिलला केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

अमोल म्हैसकर (रा. आलापल्ली) याने यासंदर्भात पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. अहेरी तालुक्यातील छल्लेवाडाचा रहिवासी असलेल्या एका दारूतस्करावर त्याने मारहाण करून पिस्तूलने धमकावल्याचा आरोप ठेवला आहे. तक्रारीत म्हैसकर याने म्हटले आहे की, तो बेरोजगार होता. संबंधित तस्कराने त्यास एजंट म्हणून काम दिले. तो विक्रेत्यांना दारू पोहोचविण्याचे काम करायचा. मांडरा (ता. अहेरी) येथील एका विक्रेत्यास २०० पेटी दारू दिली होती. त्याने दारू बनावट असल्याचा दावा करून पैसे दिले नाहीत. यातून वाद वाढला. इकडे तस्कराने त्याच्याकडे पैशाचा तगादा लावला. ६ एप्रिलला त्यास मल्लमपल्लीच्या जंगलात नेऊन मारहाण केली व पिस्तुल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. तो केव्हाही माझी हत्या करू शकतो, अशी शंका म्हैसकर याने व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गडचिरोली पोलिस विभागाकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here