सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धा ,5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

116

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धा ,5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

प्रवेशिका सादर करण्यास 31 ऑगस्ट पर्यतची मुदत

S bharat news network

गडचिरोली, दि.22 : राज्य शासनाच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा निवड समितीचे सचिव श्रीराम पाचखेडे यांनी केले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेशोत्सव मंडळाने आपला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेल वर 31 ऑगस्ट 2024 पूर्वी पाठविणे आवश्यक आहे. अर्जाचा नमूना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 31 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयात परिशिष्ट-अ मध्ये देण्यात आला आहे. तसेच जिल्हा नियोजन कार्यालयातही उपलब्ध आहे. सदर स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषणरहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.

7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयाने गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील.

निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हिडीओग्राफी व कागदपत्रे जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व व्हिडीओसह जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्याकडे सादर करतील.

राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन श्री पाचखेडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here