गणेशपूरात निघाले शिक्षणाचे वाभाडे ; एका वर्गखोलीतून५ वर्गाचा चालतो गाडा.. !
गणेशपूर चक येथे वर्गखोलीचे बांधकाम मंजूर करा ; गावकऱ्यांची सीईओकडे मागणी
आरमोरी पंचायत समिती अंतर्गत सिर्सी ग्रामपंचायती मध्ये समाविष्ट असलेल्या गणेशपूर चक येथे एका वर्गखोलीतून ५ वर्ग चालविले जात असल्याची माहिती उजेडात आली आहे. सदर बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. एका वर्ग खोलीतून शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून नवीन वर्गखोलीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
देशपूर येथील नागरिकांनी काल शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांची भेट घेऊन सदर बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी गडचिरोली येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजीत करून गावातील शैक्षणिक समस्या पत्रकारांसमोर मांडली.
माजी ग्रा. पं.सदस्य अनिल नवघरे व नागरिकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ग्रामपंचायत सिर्सी कार्यक्षेत्रातील गणेशपूर चक चक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1 ते 5 वर्ग असून 26 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतू शाळेकरीता एक खोली षटकोनी इमारत आहे. या एका खोलीतून 5 वर्ग सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणी करीता पुरेशी जागा मिळत नाही. एका खोलीत पाचही वर्गाचे विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमत नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर होत आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. आता शाळा यावर्षी शाळा नियमित सुरू झाली असून एकाच वर्गखोलीत विद्यार्थ्यांना कोंबून पाचही वर्ग घेतले जात आहे. एकीकडे शासन बालकांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करीत असतांना दुसरीकडे गडचिरोली जिल्हयातील गणेशपूरचक शाळेत विद्यार्थ्यांसाठी साध्या वर्गखोल्या नाहीत, ही गडचिरोली जिल्हयासाठी मोठी गंभिर असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कसा होणार असा सवालही गावकर्यांनी उपस्थित केला.
गणेशपूर चक येथे वर्गखोलीचे बांधकाम मंजूर करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे. तातडीने मंजूर करावे, वर्ग खोलीचे बांधकाम पुर्णहोईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा शाळा बंद आंदोलन छेडण्यात येईल इसा इशारा गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे.
पत्रकार परिषदेला अनिल नवघरे, कुमोद नवले, सोमेश्वर कोसरे, अनिता नवघरे, ज्योती नवघरे, रोहिणी नवघरे, अर्चना नवघरे, सुुनिता थोरात, सुनिता देशमुख, हिरू नवघरे, उर्मिला नवघरे, कविता पुटे, शिल्पा नवघरे, माया नवघरे, सुभद्रास शेलोटे, दिपाली शेलोटे, ममता कुळमेथे, जिजाबाई तुमरेटी, धनश्री नवघरे, सुशिला घुबडे, शोभा कुळमेथे शालू ठाकरे, सुरेखा थोरात उपस्थित होते.