तरुणाईसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,आपण कधी होणार त्यांच्या समान

109

तरुणाईसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,आपण कधी होणार त्यांच्या समान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त !

शालेय जीवनात असताना आमच्या शाळेमध्ये नेहमी महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या करण्यात येत होत्या. त्यामध्ये आमचे शिक्षक नेहमी कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही ओळी म्हणत. ‘थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा,

आपण त्यांच्या समान व्हावे हाच त्यातील बोध खरा या ओळीचा आज विचार करत असताना नेहमी एक प्रश्न माझ्या मनात येते, मग हे महात्मे महापुरुष कोण हो ? त्यांचे लक्षणं काय कुणाला म्हणता येईल महात्मा, या सर्व बाबीवर विचारविनिमय करता यावेळी स्वामी विवेकानंद यांचे वाक्य मला आठवते, ज्या व्यक्तीने या पृथ्वीतलावर जन्म घेतलाव जन्म घेतल्यानंतर आपले जीवनाचे ध्येय निश्चित केले व त्या ध्येयाचा उपयोग समाजासाठी- देशासाठी केला तर तो व्यक्ती म्हणजे महापुरुष किंवा महात्मा होय.

या वाक्यावर विचार करताना खूप साऱ्या महापुरुषांची नावे आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यापैकी एक ज्यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे, ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी त्यांचे अनेक पैलू डोळ्यासमोर येतात. त्यामध्ये विद्यार्थी, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, संपादक, लेखक, वक्ते, संविधान निर्माता, समाजशास्त्रज्ञ, कायदे तज्ज्ञ असे अनेक किंवा यापेक्षाही विविध बाबींचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये समावेश होतो. परंतु याहीपेक्षा ज्यावेळी आपण आपला देश हा तरुणांचा-बुवांचा देश म्हणतो, त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एकेक प्रसंग आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरताना दिसतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू (मध्यप्रदेश) मध्ये झाला. रामजी आणि भीमाबाई यांचे ते चौदावे पुत्ररत्न होते. त्यांचे बालपणीचे नाव होते भीम. बाबासाहेबांचा एकंदरीत जीवनकाळ हा आव्हानांनी भरलेला व संघर्षमय होता. अस्पृश्य जाती म्हणजेच महार जातीत जन्म झाल्यामुळे लहानपणापासूनच अस्पृश्यतेची झड त्यांना सोसावी लागली. याबद्दल बोलत असताना बाबासाहेब स्वतः काही अनुभव सांगतात …

सयाजीराव गायकवाड यांच्याकडून छात्रवृत्ती मिळाल्यानंतर अमेरिकेतील न्युयार्क २१ जुलै १९९३ ला येथे पोहोचून कोलंबिया विश्वविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. राज्यशास्त्र विषयात प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी तिथूनच एम.ए., पी.एच.डी. च्या डिग्री प्राप्त केल्या. बाबासाहेब ज्यावेळी अमेरिकेला गेले, त्यावेळी त्यांचे वय फक्त बावीस वर्ष होते. अमेरिकाही भोगविलासाची जमीन त्यामुळे स्वाभाविकच या सर्वांवर विजय प्राप्त करत आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण होते. सुरुवातीला या प्रकारच्या स्वच्छंद जीवनाचा त्यांनी आनंद लुटला. त्यामध्ये त्यांना रससुद्धा यायला लागला होता. एका रात्री जवळपास ३ वाजताच्या दरम्यान त्यांना विचार यायला लागले मी हे काय करत आहे ? आपल्यावर खूप प्रेम करणाऱ्या परिवाराला हजारो मैल दूर सोडून आपण अभ्यास करण्यासाठी येथे आलो आहे आणि मी हे सर्व सोडून मौज-मस्ती करत आहे. असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊन त्यांना त्यांच्या ध्येयाची प्रचिती होते व ते पुन्हा योग्य मार्गावर येतात व परिश्रम पूर्वक आपले शिक्षण पूर्ण करतात.

आज ज्यावेळी आपण समाजात बघतो, त्यावेळी आपल्याला मोठ्या प्रमाणात युवावर्ग अभ्यासाला सोडून भोगविलासामध्ये गुरफटत चालला आहे असे दिसून येते. आपले ध्येय, समाज, देश या सर्व बाबींचा त्यांना विसर पडत चालला आहे. आज बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे स्मरण करताना आपण आपल्या ध्येयाला घेऊन एकनिष्ठ होऊ का याचा विचार आपण युवा म्हणून करू शकतो का?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी याला प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. फक्त डिग्री प्राप्त करणे हे आपल्या शिक्षणाचे उद्दिष्टनसले पाहिजे. सगळ्या विषयाचा अध्ययन करून बाबासाहेब त्यांची ख्याती वाढवू शकले असते. हे त्यांना माहीत होते. मोठ्या पदावर नोकरी भूषवू शकले असते. परंतु या सर्वांना सोडून आपण घेतलेल्या शिक्षणाचा समजासाठी देशासाठी कसा उपयोग होईल, याचा त्यांनी विचार केला आणि त्यामुळे त्यांनी लिहिलेले प्रबंध ग्रंथ किंवा संविधान लिहिताना त्यांनी समाज देश यांचा विचार केल्याचे दिसून येते. यावरून शिक्षण हे डिग्रीसाठी नाही तर त्याचा उपयोग देश समाजाकरिता कसा होईल, याचा विचार त्यांनी केला. त्यामुळे आज शिक्षण घेताना फक्त डिग्री म्हणून नाही तर त्याचा उपयोग समाज देश यांच्यासाठी कसा होईल ‘देश हमे देता है, सबकुछ हम भी तो कुछ देना सिखे’ ही भावना निर्माण कशी होईल, याचा विचार युवक म्हणून आपल्याला करता येईल का ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहीत होते की, आपल्याला जर आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व समस्यांवर मात करायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे त्यांना उमगले होते आणि अतिशय जिद्द आणि चिकाटीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बालपणी वर्गाच्या बाहेर बसून ते शाळा शिकले, हे प्रसंगही आपल्याला माहीत आहे. लंडनमध्ये डी.एस.सी. आणि बार. एट. ला चे शिक्षण घेत असताना त्यांचे जेवण म्हणजे एक पावाचा तुकडा, एक कप चहा असा असायचा केव्हा केव्हा वाचण्याचा अध्ययनाचा वेळ कमी पडत असल्यामुळे लायब्ररी मध्येच रात्रभर अभ्यास करत. हे प्रसंग आपल्याला माहीत आहे यावरून त्यांची आपल्या अभ्यासा प्रतीची जिद्द व चिकाटी दिसून येते.

ज्यावेळी रामजी आंबेडकर सेवानिवृत्त झाले त्यानंतर सातारामधील गोरेगावमध्ये मजदुरांना वेतन वाटण्याचे कार्य करायचे तिथे साताऱ्याला बाबासाहेबांना खऱ्या अर्थात अस्पृश्यतेची अनुभूती व्हायला लागली. ते सांगतात आम्ही भावंडे ज्यावेळी न्हाव्याजवळ केस कापायला जात होतो, त्यावेळी तो व्यक्ती आम्ही अस्पृश्य आहोत म्हणून नकार द्यायचा आणि अशा परिस्थितीत त्यांची मोठी बहीण त्यांचे केस कापून देत होती. त्यावेळी त्यांच्या मनात प्रश्न यायचा की साताऱ्यामध्ये न्हावी असूनसुद्धा आपले केस का नाही कापून देत? याप्रकारची वागणूक समाज आपल्याला का देतो ?

दुसरा प्रसंग म्हणजे बाबासाहेब नेहमी सांगत. एकदा साताऱ्याहून आम्ही भावंडे गोरेगावला आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेलो, त्यावेळी त्यांचे वडील त्यांना घ्यायला येऊ शकले नाही, अशावेळी त्या ठिकाणी असलेल्या स्टेशनमास्तरनी त्यांची चौकशी केली की ब्राह्मणासारखे दिसणारे मुले कोणाची, परंतु ज्यावेळी त्यांना समजलं की ही तर महाराची मुले आहेत, त्यावेळी स्टेशन मास्तरही चार पाऊले मागे गेला. शेवटी कशीतरी बैलगाडी मिळाली परंतु त्यामध्ये बैलगाडी हाकणारा न बसता त्यांनी तो प्रवास पूर्ण केला. याप्रकारे बालपणापासून ते कॉलेज जीवनात प्राध्यापक जीवनात त्यांना वेगवेगळ्या प्रकारे या अस्पृश्यतेमुळे त्यांना मान अपमानांना सामोरे जावे लागले. हा सर्व त्यांच्या जीवनातील काळ संघर्षमय होता परंतु यामध्येसुद्धा ‘घबराओ नहीं, ”जीवन आशादायी होगा’! असे म्हणत आपल्या समाजामधून ही अस्पृश्यता कशाप्रकारे दूर करता येईल, या देशांमध्ये समरसता कशी निर्माण करता येईल, यासाठी अथक निरंतर कार्य केले व तो बदल आज समाजात आपल्याला दिसून येतो. ती खरी बाबासाहेबांची पुण्याई.

मला वाटतं असा आशावाद आपल्याला आजचा युवा म्हणून निर्माण करता येईल का, जीवनात कितीही संकटे येवो जीवन कितीही संघर्षमय होवो जिंकण्याचा आशावाद निर्माण करता येईल का, याचा विचार करू या. समाजाने मला काय दिले यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो, ही भावना असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते त्यांच्यामध्ये समाजासाठी व देशासाठी असलेली समर्पण वृत्ती दिसून येते मग ती काळाराम मंदिर सत्याग्रह, महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, पुणे करार व त्यांनी दिलेला कायदामंत्रीपदाचा राजीनामा हे समाजाप्रति असलेली त्यांची समर्पणाची भावनाच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाची तब्येत खूप बिघडली असताना डॉक्टर येऊन तपासणी करतात व शेवटी डॉक्टर रमाईला सांगतात की, तुमचा मुलगा काही वेळातच स्वर्गवासी होईल, रमाईच्या डोळ्यातून अश्रू कोसळते व ती बाबासाहेबांकडे पाहते बाबासाहेब दिव्या खाली आपल्या वर्तमानपत्रासाठी संपादकीय लिहीत असतात. बाबासाहेबांजवळ जाऊन रमाई म्हणते आपला मुलगा शेवटचा श्वास मोजत आहे, तुम्ही त्याला थोडा वेळ बघा तरी. त्यावर बाबासाहेब काहीही लक्ष न देता आपल्या लेखनात मग्न असतात. त्यावररमाई म्हणतात, तुमचापोटचा मुलगा मरण पावतो आहे आणि तुम्हाला लेखन काम सुचत आहे. मित्रांनो त्यावर बाबासाहेब म्हणतात, रमाबाई माझा एक मुलगा मरण पावला म्हणून काय झालं आज या देशामध्ये लाखो माझी मुले आहे, जी माझी वाट पाहत आहे. वावरून बाबासाहेब आपल्या कार्याला घेऊन आपल्या समाजाप्रति किती समर्पित होते हे दिसून येते.

१३ ऑक्टोबर १९३५ येवला मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर घोषणा करतात की ‘मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.’ आणि ही शपथ घेतल्यानंतर दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी घेतल्यानंतर १४ ऑक्टोबर १९५६ ला ते नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतात यावरून त्यांची आपल्या वचनाबद्दल किती प्रतिबद्धता होती, हे दिसून येते. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग त्यांचे पैलू आजच्या आपल्या तरुणपिढी युवकांसाठी दिशादर्शक ठरू शकतात, ज्यामुळे मला वाटत की आपला देश परमवैभव व विश्वगुरूपदावर पोहोचण्यास समन्वयक होईल हे निश्चितच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.

 

 

डॉ. संदीप मनोहर लांजेवार

समन्वयक, मॉडेल डिग्री कॉलेज,

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

9975650184/ 8830373384

 

संदर्भ:- संघर्ष महामानव का – रमेश पतंगे

उवाच – श्री संजय पाचपोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here