गडचिरोली जिल्ह्यात सरकारने केलेल्या घोषणा ठरल्या फोल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर टीका
सरकारकडून स्थानिक भूमीपुत्रांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम
रोजगाराच्या नावाखाली स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय
Gadchiroli – गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रोजगार व शेतकरी यांची दयनीय अवस्था असून सरकारने केलेले दावे प्रतिदावे व घोषणा या फोल ठरल्या आहेत. सरकारने इथे आणलेले उद्योग हे मूठभर लोकांसाठी उभारले गेले आहेत. सरकारकडून रोजगाराच्या नावाखाली स्थानिक भूमिपुत्रांच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम केलं जातंय, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी
गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आदिवासी मुलांचं वस्तिगृह, जिल्हा प्रशासन रुग्णालय येथे आज भेट देऊन पाहणी केली.
दानवे यांनी वस्तिगृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले.
यावेळी विद्यार्थ्यांनी भोजनाचा निर्वाहभत्ता वाढवून देण्याची मागणी केली असता, हा मुद्दा सरकार दरबारी मांडण्याची ग्वाही यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाने दिलेला एमआरआय सुविधेचा प्रस्ताव गेल्या २ वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. येथील स्थानिकांना एमआरआय काढण्यासाठी नागपूर किंवा चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागत ही स्थिती भूषणावह नसल्याचे सांगत दानवे यांनी सरकारचे वाभाडे काढले.
स्थानिकांना रोजगार व त्यांना जास्त चांगल्या पदावर काम मिळायालाच हवं त्यादृष्टीने
कौशल्य विकास विभागाने कंपनीच्या आवश्यकतेनुसार आयटीआय सारख्या संस्थेत अभ्यासक्रम सुरू केले पाहिजे. यासाठी शासनाकडे आग्रही भूमिका मांडण्यात यावी
अशा सूचना दानवे यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या.
जिल्ह्यातील ४८८ पैकी ५५ गावांतील ग्रामपंचायतीला स्वतःची इमारत नाही, तर २०० गावांना जोडणारा रस्ताच नाही यावरून सरकारचे दावे हे फोल ठरले असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
वाळू, लोह या खनिज संपत्तीची परराज्यात विना तपासणी वाहतूक केली जातेय. त्यामुळे
खनिज तस्करी होतेय की काय अशी शंका दानवे यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध दारू केंद्र सुरू असून त्यामुळे व्यसनाधीनतेकडे लोकांचे प्रमाण वाढल्याने संबंधित आजार बळावत असल्याचे दानवे यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले. अवैध दारू केंद्र सुरू असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनीदेखील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मान्य केले. मात्र फक्त कबुली न देता त्यावर कठोर निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे दानवे म्हणाले.
सुरजागड येथील आयर्न आणि मायनिंग प्लांटमध्ये स्थानिक भूमिपुत्रांपैकी फक्त ८८ जणांना थेट भरती दिली. तर ३४४५ स्थानिकांना कंत्राटी स्वरूपात रोजगार दिला.
लॉयडस मेटल अँड एनर्जी या कंपनीत
५१३ पैकी २ स्थानिकांना कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली तर उर्वरित ५११
स्थानिकांना सामान्य कामगार म्हणून रोजगार दिला. या कंपनीत मोठया पदांवर एकही भूमिपुत्र नसल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली.
गडचिरोली जिल्ह्यातील बंद पडलेले अभियांत्रिकी महाविद्यालय,स्थानिकांना रोजगार, शेतकऱ्यांना शेतीसाठी अविरत वीजपुरवठा, पायाभूत व आरोग्य असुविधा याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दानवे यांनी आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुज तरे, सर्व विभागाचे अधिकारी वर्ग,संपर्कप्रमुख किशोर पोद्दार, अरविंद कातटवार, जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल, जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, सहसंपर्कप्रमुख विलास कोडान
महिला संघटिका छायाताई कुंभारे, माजी आमदार डॉ नामदेव उसंडे उपस्थित होते.