1 डिसेंबर 2022 जागतिक एड्स दिन साजरा
गडचिरोली,(Gadchiroli)दि.01: जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक यांच्या संयुक्तवतीने दि.01 डिसेंबर 2022 जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथून सकाळी 8.30 वाजता डॉ. अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सोळुंके, नोडल ऑफिसर डॉ. नागदेवते, वैद्यकीय अधिक्षक, डॉ. माधुरी किलनाके मॅडम, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, प्रा.बारसागडे, फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, महेश भांडेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचारी मराएनिसो येथील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली, डॉ. अनिल रुडे मार्गदर्शन करताना एचआयव्ही/एड्सचे तरुणाईमध्ये वाढते प्रमाण व त्यावर संयम हाच एकमेव उपाय पुढील भविष्यात असेल असं मार्गदर्शन केले.
सदर रॅलीमध्ये मोठया प्रमाणात नर्सींग स्कुल, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फुले आंबेडकर महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, पॉलिटेक्नीक कॉलेज, कृषी महाविद्यालय, शिवाजी विज्ञान कॉलेज येथील विद्यार्थ्यांचा तसेच सखी वन स्टॉप सेन्टर व विहान यांचा सहभाग होता. समारोपीय कार्यक्रमात फुले आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एचआयव्ही/एड्स या विषयावर पथनाटय सादर केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश गोंडाने आणि आभार प्रदर्शन महेश भांडेकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी केले आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.