शेतकरी कर्ज( कविता)

137

शीर्षक – शेतकरी कर्ज

आहे मी शेतकरी
कोण ऐकणार माझी व्यथा,
जगाचा मी पोशिंदा
लिहिली मी कर्जाची कथा…१

दुष्काळ माझ्यासाठी
निसर्गाची ही करणी,
माझेच भोग भोगतो
सांगू कुणा मी वाणी…२

नाव माझे देशात
महान तो शेतकरी,
संकट समय कोणी
येणार नाही दारी…३

झाले ते महाग
खते बियाणे सारे,
सबसिडीचे नावाने
हवेत जाती उडून वारे…४

लुटले सारे शेतकऱ्याला
करून हमीभाव कमी,
फक्त भाषणाचा ऐकतो
देऊ दरवाढीची हमी…५

खर्च नाही निघत
विकलेल्या धान्यातून,
सोडू जमीन कशी,
त्या बँकांच्या ताब्यातून…६

कर्ज फेडता फेडता
लीलावत काढली जमीन,
फिटले नाही कर्ज माझे
जगु कसे रे मी जीवन…७

हातातील गेली जमीन
तिथे झाला कारखाना,
माझ्याच मुलासाठी
तिथे नोकरी सुद्धा मिळेना…८

काय पाप माझे
शिक्षा कोणत्या भोगाची,
विसरलास का देवा
वाट माझ्या घराची…९
—————————–
कवी – भारत आनंद खनगावकर
सुरूते, चंदगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here