शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यत पोहचविण्यासाठी कटिबद्ध  जिल्हाधिकारी संजय दैने

68

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यत पोहचविण्यासाठी कटिबद्ध  जिल्हाधिकारी संजय दैने

स्वातंत्र्यदिनाचा 77 वा वर्धापण साजरा

S bharat news network

गडचिरोली, दि. 15 (जिमाका)- सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून राज्य शासनाने अनेक महत्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. या सर्व जनकल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा तत्पर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापण दिनानिमित्त जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की जिल्ह्यात रस्ते, रेल्वे, विमानतळ, उद्योग आणि इंटरनेट-मोबाईल नेटवर्क यांसारख्या पायाभूत सुविधांना बळ देवून महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची मालिका सुरू आहे. गडचिरोली जिल्हा राज्यातील प्रगतीचे आणि संधीचे क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. शासनाच्या या उपक्रमांचा येथील प्रत्येक नागरिकाला लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. या विकास कामातून गडचिरोलीची मागास-जिल्हा ही जुनी ओळख पुसून नवीन ओळख आपल्याला निर्माण करायची आहे. येथील लोहप्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ ही नवी ओळख मिळत असल्याचे ते म्हणाले.

सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून शासनाने अनेक महत्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. यात महिलांना आर्थिंक स्वावलंबन देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, युवकांना रोजगार देणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’, शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’, वर्षातून तीन सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’, मुलींना मोफत उच्च तंत्र शिक्षण देण्याचा शासन निर्णय, ज्येष्ठ नागरिकांसाठीची ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ आणि ‘वयोश्री योजना’, यासह राज्य व केंद्र शासनाच्या इतर योजनांचा समावेश आहे. या सर्व योजनांचा लाभ पात्र लाभार्थी कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील दीड लाख महिलांचे अर्ज राज्यातून सर्वप्रथम मंजूर करून शासनाकडे पाठवण्यात आले. त्यातील इ-केवायसी पूर्ण झालेल्या भगीणींच्या खात्यात एक-दोन दिवसांतच पैसे मिळण्यास सुरूवात होईल. ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवित असल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. यासोबतच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यात मिळाल्याचे आणि नागपूर विभागातून आतापर्यंत सर्वाधिक प्रशिक्षणार्थींची नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातून झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर 641 कोटी नियतव्यय पैकी 213 कोटी निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे यातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकास कामे मार्गी लावण्यात येतील.

या वर्षात चामोर्शी तालुक्यातील हल्दिपुराणी उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्याने 22 गावांना सिंचनाची सोय झाली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगाराची मागणी केलेल्या प्रत्येकाला म्हणजे तब्बल 85 हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि जिल्ह्यात चालू वर्षात 25 लक्ष मनुष्यदिन निर्मिती साध्य करण्यात आली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब लाभार्थीच्या 2 लाख 22 हजार शिधापत्रिकाधारकांना दरमाह मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. आगामी गौरी-गणपती उत्सवानिमित्त या सर्व लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून नुकसान-भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे शिफारस केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जून-जुलै या कालावधीत मयत झालेल्या 8 नागरिकांच्या वारसदारांना प्रत्येकी 4 लक्ष रुपये प्रमाणे एकूण 32 लक्ष रुपये मदतचे वाटप तात्काळ करण्यात आले. तसेच 72 जनावरे मृत झाल्याने सदर नुकसानग्रस्तांनाही तातडीने 17 लक्ष 44 हजार रुपये मदतीचे वाटप करण्यात आले आहे. पूर परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन दलाने चांगली कामगिरी केल्याबद्दल श्री दैने यांनी त्यांचे अभिनंदन केले.

गडचिरोली पोलीस दलाने या वर्षात 21 माओवाद्यांचा खात्मा केला तर 24 माओवाद्यांना अटक केली. त्यासोबतच 11 माओवाद्यांचे मनपरिवर्तन करून त्यांचे आत्मसमर्पण घडवून आणले. तसेच लोकसभा निवडणूक प्रथमच निर्विघ्नपणे पार पाडण्यात पोलीस दलाची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगून त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल व त्यांच्या सहकारी वर्गाचे अभिनंदन केले.

लोकसभा-2024 च्या निवडणूकीत, येथील 72 टक्के मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य चोखपणे बजावले. आगामी विधानसभा निवडणूकीतही यापेक्षाही जास्त टक्केवारी प्राप्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.

विविध कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच चुरचुरा येथे पूरात वाहून जाणाऱ्या तीन व्यक्तींचे प्राण वाचवणाऱ्या अनिल गेडाम व स्थानिक नागरिकांचा विशेष गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.

कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी-बांधव, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here