राष्ट्रीय पोषण महिन्याची यशस्वी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी, संजय मीणा
गडचिरोली,दि.06 : राष्ट्रीय पोषण महिना जिल्हयात 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय अंमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. यावेळी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पोषण अभियानामध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सर्व यंत्रणांना उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण श्रीमती इंगोले यांनी झालेल्या उपक्रमाबाबत माहिती सादर केली.
महिला आणि स्वास्थ, बालक आणि शिक्षण- पोषणाबरोबर शिक्षण देखील, लिंग संवेदनशीलता, आदिवासी भागातील महिला आणि मुलांसाठी पारंपारीक खाद्यपदार्थ अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पोषण माह रॅली, पोषण प्रतिज्ञा, गरोदर व स्तनदा माता पोषण विषयी जागृती, किशोरी मुली व गरोदर माताची एचबी तपासणी, किशोरी मुली व गरोदर मातासाठी योग्य शिबीर घेणे, किशोरी स्पर्धा, विविधउपक्रम, गर्भवती महिलाकरीता पोषणावर आधारीत प्रश्न मंजुषा घेणे, आहारावर मार्गदर्शन, गरोदर व स्तनदा मातांना आयएफए गोळया वाटप करुन त्याविषयी माहिती देणे, माझी कन्या भाग्यश्री, मातृवंदना योजना, मिशन वात्सल्य विषयी मातांना माहिती देणे, किशोरी व मातांना वैयक्तीक स्वच्छतेविषयी माहिती देणे, पालक सभा घेणे, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती इंगोले यांनी दिली.
स्वस्थ बालक बालिका स्पर्धेचे आयोजन – स्वस्थ आणि आरोग्यदायी बालकांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. पाच वर्षाखालील मुलांमधील वाढीचे मोजमाप याबाबत जनजागृती होण्यासाठी अभियानाचे आयोजनातून जनजागृती करण्यात येत आहे.