Aarmori – gadchiroli आरमोरी : नजीकच्या वैनगंगा नदी पुलावर आपली दुचाकी व मोबाईल सोडून एका तरुण महिला पोलिस शिपायाने नदीत उडी घेतल्याची घटना आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. शारदा नामदेव खोब्रागडे (30) असे शिपायी महिलेचे नाव आहे. सदर महिला पोलिस शिपायी मुळची सिंदेवाही तालतुक्यातील शिवणी येथील रहिवासी असून ती भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती आहे.
आज दुपारच्या सुमारास महिला पोलिस वैनगंगा नदी पुलावर दुचाकी घेऊन आली. दुचाकी व मोबाईल तिथेच सोडून तिने नदीत उडी घेतली. याची माहिती तत्काळ आरमोरी पोलिसांना देण्यात आली. यादरम्यान नदी पुलावर बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. पोलिस पथक तसेच आरमोरी तहसिल कार्यालयाच्या बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठित नदीपात्रात शोध मोहिम राबविली. मात्र रात्री उशिरापर्यंत तिचा थांगपत्ता लागला नाही. नुकताच गोसेखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे शारदा खोब्रागडे नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक करीत आहेत.