आदिवासी सन्मानार्थ गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजीत “गडचिरोली महा-मॅरेथॉन-2024, सिझन 2” च्या लोगोचे अनावरण
01 ते 10 डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करता येणार
गडचिरोली:- पोलीस दलातर्फे गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी तरुण युवक-युवतींना स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी निर्माण व्हावी, तसेच आदिवासी भागात विकास व्हावा यासाठी सामाजिक बांधीलकीच्या दृष्टीने, आदिवासी समाजाच्या विकास व सन्मानास्तव नूतन वर्षात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण शुक्रवार दिनाक 01/12/2023 रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयात गडचिरोली जिल्ह्राचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता व मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.
या मॅरेथॉन स्पर्धेत, 03 किमी, 05 किमी, 10 किमी व 21 किमी अंतराची स्पर्धा आयोजीत करण्यात आली असून, यामध्ये समाजाच्या सर्वच स्तरातून आबालवृद्धांचा सुमारे 13 ते 15 हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. गडचिरोली महा मॅरेथॉन 2023 मध्ये दहा हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असून विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. सहभागी असलेल्या सर्व धावपटूंना किट, टी-शर्ट, बॅजेस, मेडल्स, प्रमाणपत्रे इ. देण्यात येणार आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेची तयारी सुरु असून मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. मयुर भुजबळ हे स्पर्धेंची संपूर्ण व्यवस्था पाहत आहेत. स्पर्धेत सहभाग होऊ इच्छिणायांनी जवळच्या पोलीस स्टेशन/उप पोलीस स्टेशन/पोलीस मदत केंद्र येथे संपर्क साधावा. तसेच या मॅरेथॉन स्पर्धेची नोंदणी मोफत असणार आहे, त्यामुळे अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.