
गडचिरोली,gadchiroli ता. ११ : कुरखेडा तालुक्यातील एका गावात सात महिन्यांच्या गर्भवतीवर दोन सख्ख्या भावांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संजय तुलाराम कपूरडेरिया (38) व ताराचंद तुलाराम कपूरडेरिया (32) या दोन भावांना अटक केली असून, दोघेही Dhamditola धमदीटोला येथील रहिवासी आहेत.

पीडित महिला ही सात महिन्यांची गर्भवती असून, काही दिवसांपूर्वी ती प्रसूतीकरिता आपल्या माहेरी आली होती. गुरुवारी (ता. १०) पीडित महिलेचे आई-वडील शेतावर गेले होते. अशातच दुपारी १२ वाजताच्या सुमारास संजय व ताराचंद कपूरडेरिया या दोन भावंडांनी पीडित महिला घरी एकटीच असल्याची संधी साधून घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. आई-वडील घरी आल्यानंतर पीडितेने त्यांना आपबिती सांगितली. त्यानंतर त्यांनी कुरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भादंवि कलम ३७६ व ३७६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी विवाहित आहेत. पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक दिनेश गावंडे घटनेचा तपास करीत आहेत.